कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल मोहिमेने जोर पकडला असून इच्छुकांनी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि संजय घाटगे यांची भेट घेतली आहे. या दोघांनीही बदलासाठी अनुकुलता दर्शविल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे.आमदार सुजित मिणचेकर, प्रवीण यादव, राजेश पाटील, राहुल आवाडे, राजू मगदूम यांनी मंगळवारी राजाराम साखर कारखान्यावर महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना सव्वा वर्षांनंतर पदाधिकारी बदलले जातील असे ठरले होते याची आठवण महाडिक यांना करून देत या सर्व बदलाला तुमचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.या सर्व प्रकरणांमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल, असे सांगून महाडिक यांनी आपले यासाठी सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. त्याच्या आदल्यादिवशी या सर्वांनी माजी आमदार संजय घाटगे यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. घाटगे यांचे चिरंजीव अंबरिष हे शिक्षण सभापती म्हणून कार्यरत आहेत.भाजपकडे असलेले अध्यक्ष आणि ‘जनसुराज्य’कडे असलेली दोन पदे वगळून किमान ३ पदाधिकारी तरी बदलले जावेत यासाठी आता इच्छुकांनी जोर लावला आहे. दि. १ जून ते ५ जून या कालावधीत किमान ३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी नेत्यांच्या या गाठीभेटी सुरू आहेत.