कोल्हापूर : आर्थिकदृष्ट्या कमकुवत महाविद्यालयांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत संलग्नित पारंपरिक महाविद्यालयांना छाननी समितीने केलेल्या शिफारशीनुसार शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता अनुदान दिले जाणार आहे. त्याला शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. सचिवपदी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यास इस्लामपूर (ता. वाळवा) येथील राजारामबापू कॉलेज आॅफ शुगर टेक्नॉलॉजीला मान्यता दिली. विद्यापीठातील मराठी अधिविभाग आणि मुंबईतील मराठी विज्ञान परिषदतर्फे विज्ञानकथा कार्यशाळा होणार आहे. त्यासाठी मान्यता देण्यात आली.
सन २०१६-१७ चे वार्षिक लेखे, ताळेबंदपत्रक, लेखापरीक्षण अहवाल, वित्त व लेखा विभागाने केलेली शिफारस मान्यता करण्यात आली. नॅशनल तैवान युनिर्व्हसिटी आॅफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी आणि नॅशनल टीसिंग हुआ युनिर्व्हसिटीसमवेत सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली.