कोल्हापूर : शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या, रोजगार हमी योजना व चारा छावण्यांची गरज कमी करणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे.
येत्या शनिवारपासून (२९ ते ३0 डिसेंबर) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील आंबोळी वसाहती मुक्ती दलाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. ११ जिल्ह्यांतील प्रतिनिधी येथे सहभागी होणार असून, येथे आटपाडी पॅटर्नसह लोकसभा निवडणुकांमध्ये चळवळी पुढे नेणाऱ्या पक्षाच्यामागे ताकद उभी करण्याचे ठराव केले जाणार आहेत.या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पाटणकर यांनी कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकार बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी १९८६ पासून चळवळीत सक्रीय असलेल्या नंदुरबारच्या ठगीबाई वसावी, गेल आॅम्वेट, संपत देसाई, मारुती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, श्रमिक मुक्ती दल राज्यात ३९ वर्षांपासून कार्यरत असून, यंदाचे हे २२ वे अधिवेशन आहे. मागील अधिवेशन साताऱ्यात झाले होते. या वेळच्या अधिवेशनाला आगामी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ असल्याने या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे, स्वतंत्र उमेदवार उभे केले जाणार नसले, तरी समग्र पर्यायी विकासाचा आराखडा मान्य असणाऱ्यांच्याच मागे चळवळीची ताकद उभी केली जाणार आहे.
याशिवाय नैसर्गिक संसाधनावरील मालकी, ही त्या भागातील जनतेची राहायला हवी असतानाही बड्या भांडवलदारांना देण्याचे धोरण मुक्ती दलाने मोडीस काढले आहे; त्यामुळे रायगड येथील अंबानी व टाटांना प्रकल्प गुंडाळावे लागले. येथून पुढे पुन्हा असे प्रकल्प हातपाय पसरू नयेत, यासाठी अधिवेशनात लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे.
काय आहे आटपाडी पॅटर्नसांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी तालुक्यात स्थानिक पाणलोट आणि बाहेरील मोठ्या धरणातील पाणी यांचे एकत्रिकरण करून, बंद पाईपलाईनद्वारे सव्वालाख हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
२00५ मध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या समन्यायी पाणी वाटप धोरणातून सातत्याने पाठपुरावा होत, २0१६ मध्ये तो पूर्णत्वास गेला आहे. अशा प्रकारे दुष्काळी पट्ट्यातील लोकांना हक्काचे पाणी उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. त्याचा विस्तार सर्वत्र केल्यास दुष्काळाची दाहकता कमी होणार आहे.
अंबाबाई मंदिरात पुजारी हटावचा लढा तीव्र होणारश्रमिक मुक्ती दलाने पंढरपूर देवालय बडवेमुक्त केले. त्यासाठी कायदा करण्यास शासनास भाग पाडले. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातही त्याच धर्तीवर कायदा करून पुजारी हटविण्याचा निर्णय झाला. तथापि, आजतागायत कायद्याची अंमलबजावणीच झाली नसल्यामुळे मंदिरात पारंपरिक पुजारी कायम आहेत. या अधिवेशनात हे पुजारी हटविण्यासंबंधी लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.