कोल्हापूर : चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस झाडलोट करण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यु. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी पांडुरंग शामराव सुतार (वय ४२, रा. पळशिवणे ता.भुदरगड) असे त्याचे नाव आहे.
१५ जुलैला दिवसभर शेतात भाताचे रोपे लावून पीडित मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर तिने गुरुजींनी आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर शिक्षक सुतार याच्या विरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. बी. शेडे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात सरकारी वकील सुजाता एस. इंगळे यांनी नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश कदम यांनी आरोपी सुतार यास कलम ३७६ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप, १ हजार रुपये दंड, दंड न भरलेस ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पोलीस हवालदार एम. एम. घाटगे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.