कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या आणि नेहमी वर्दळ असणाऱ्या उजळाईवाडी येथील प्रवीण पेट्रोल पंपावर तीन अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा टाकून कर्मचाऱ्यांवर हल्ला करत रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी गोकुळे शिरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत आहेत.गुरुवारी मध्यरात्री ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकीवरुन आलेल्या तीन संशयितांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे पेट्रोल त्यांच्या तीन्ही दुचाकीत भरले. त्याचे पैसे पंपावरील कर्मचाऱ्यांनी मागताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
यावेळी तेथे आलेल्या पंपचालकाच्या दोन्ही मुलांवरही त्यांनी जीवघेणा हल्ला केला, तसेच बांधकामासाठी आणलेल्या सिमेंटच्या विटा काचेच्या पेट्रोल पंपाच्या तावदाणावर मारून काचाही फोडून दहशत माजवली, तसेच पंपावरील रोख रक्कमही लंपास करुन ते पळून गेले.
दरम्यान, हा प्रकार रोखण्यासाठी पुढे गेलेल्या नितीन नारायण माने (वय-३३) , सागर नारायण माने (वय-३५) , पंप अटेडन्स कर्मचारी बाजीराव शिवाजी पाटील, सुदेश सदाशिव माळी यांच्यावर या चोरट्यांनी हल्ला केल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात पंपचालक नारायण माने यांच्या दोन्ही मुलांपैकी एकाच्या पायावर तर एकाच्या डोळ्यावर संशयितांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची नोंद शुक्रवारी सकाळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून हे संशयित उजळाईवाडी परिसरात दहशत माजवणे, हप्ते गोळा करणे, दमदाटी करणे, भुरट्या चोऱ्या करणे यासह अन्य गुन्ह्यात सहभागी आहेत. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संशयित स्पष्ट दिसत असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
पाहा व्हिडीओ -