कोल्हापूर : ऊसाची एकरकमी एफआरपी न मिळाल्यास येत्या २५ तारखेला पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे दिला. एफआरपीसाठी तिजोरी रिकामी करू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सभेत जावून जाब विचारणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.स्वाभिमानी संघटनेच्यावतीने एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी दसरा चौकातून लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये रविकांत तूपकर, सावकर मादनाईक, भगवान काटे, राजेंद्र गड्डाण्णावार, जालंदर पाटील,सयाजी मोरे या प्रमुख नेत्यांसह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील व सीमाभागातील शेतकरी सहभागी झाले.
पैसा आमचा घामाचा, घेतल्या शिवाय राहणार नाही. एकच गट्टी, राजू शेट्टी अशा घोषणा देत व आसूडाचे फटकारे ओढत हा मोर्चा निघाला. या प्रश्र्नांवर शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने कांही अनूचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांना झेंड्याची काठीही घेवून येण्यास मज्जाव करण्यात आला. सहसंचालक कार्यालय शहराच्या मध्यवस्तीतच असल्याने मोर्चामुळे दिवसभर वाहतूकीची कोंडी झाली.