कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील बंद घराच्या स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. दोन्ही कपाटांतील साहित्य विस्कटले. मात्र हाती काहीच न लागल्याने चोरटे निघून गेले. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.अधिक माहिती अशी, राजोपाध्येनगरमध्ये प्लॉट नं. १९७ येथे प्रकाश गणपत कुंभार यांचे घर आहे. ते उन्हाळी सुट्टीमुळे कुटूंबासह दि. ११ मे पासून गावी गेले होते. मंगळवारी (दि. १५) रात्री घरी आलेनंतर त्यांना चोरी झालेचे दिसून आले.
स्वयंपाक खोलीच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्याने आत प्रवेश केल्याचे दिसून आले. कपाटातील साहित्य विस्कटले होते. मात्र एकही मौल्यवान वस्तू चोरट्यांच्या हाती लागली नाही. चार दिवसापूर्वी याच परिसरात राहणारे बापूसाहेब विश्वंभर पेडणेकर यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न झाला होता.
जिव्हाळा कॉलनी येथे शंभू चंद्रकांत मेरवाडे, बोंद्रेनगर येथील शिक्षक उमेश भागोजी आडुळकर यांच्याही घरी चोरी झाली होती. गेल्या पंधरा दिवसात या परिसरात सात ते आठ घरफोड्या घडल्या आहेत.
पोलीसांची रात्रगस्त कमी पडत असल्याचे वाढत्या घरफोड्यांवरुन दिसत आहे. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकात घबराट पसरली आहे.