कोल्हापूर : आज देशामध्ये प्रामुखाने दोन महत्वाच्या समस्या आहेत. दहशतवाद आणि नक्षलवाद, परंतू नक्षलवादाचे लोण शहरी भागात पसरले आहे. म्हणूनच विचारांची फुट पडून, बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला जर पायबंद घालायचा असेल तर नक्षलवादी भागातील लोकांना आम्ही तुमच्याकरीता आहोत, तुम्ही आमचे आहात ही भावना वाढीला लावणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रगतीची सुरुवात शाहुपूरी पोलीसांनी केली आहे, असे मत विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले.
शाहुपूरी पोलीस ठाणे आणि व्हिजन ट्रस्ट अक्षय मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांना ट्रक भरुन कपडे पाठविण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अॅड. निकम व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे हस्ते झेंडा दाखवून ट्रक गडचिरोलीकडे रवाना झाला.
यावेळी अॅड. निकम म्हणाले, गडचिरोली भागातील नक्षलग्रस्त लोकांना कपड्यांची नितांत गरज आहे. हे पाहूनच शाहुपूरी पोलीस आज कपड्यांनी भरलेला ट्रक पाठवित आहेत. समाजापुढे त्यांनी एक वेगळा आदर्श दाखविला आहे. पोलीस म्हणजे फक्त कायदा व सुव्यवस्था नाही, तर लोकउपयोगी सेवा करु शकतो हे त्यांनी दाखविले आहे.नक्षलवाद आणि दहशतवाद का निर्माण होतो. आज शहरी भागात नक्षलवाद होवू घातला आहे. त्यामुळे बुध्दीभेद करणे हे काही लोकांचे काम होवून बसले आहे. अशावेळी पोलीसांकडून आपण अपेक्षा करतो. पोलीसांनी समाजापुढे चांगला आरसा दाखविला, तर समाज देखील तुमचं चांगलं प्रतिबिंब आरशात बघेल. त्यांनी चांगलं प्रतिबिंब असलेला आरसा बाळगण ही आज काळाची गरज असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. या उपक्रमातील ३५ सहभागी मंडळ, व्यक्तिंना अॅड. निकम यांचे हस्ते यावेळी सन्मानपत्र देण्यात आली. प्रस्ताविक शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी केले.
आभार संताजी घोरपडे यांनी मानले. कार्यक्रमास राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, महापालिका स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ प्राज्ञापुरीचे अध्यक्ष एन. आर. बुधले आदींसह नागरिक उपस्थित होते.