कोल्हापूर : दुकान बंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केल्याच्या रागातून पुतण्याने स्टेशन रोडवरील चुलत्याच्या हॉटेलची तोडफोड करून पेट्रोलचे पेटते गोळे फेकून पेटविण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (दि. १४) रात्री केलेल्या हल्ल्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संशयित पुतण्या मन्सूर शेख याच्यासह चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, अमीर मुमताजअली शेख (वय ६०, रा. ताराबाई पार्क) यांचे स्टेशन रोडवर हॉटेल आहे. या हॉटेलच्या तळमजल्यावर त्यांचा पुतण्या मन्सूर शेख राहतो. घरातच दुकान काढून फिश टँक व कुत्र्यांच्या खाद्याची तो विक्री करीत असतो. मन्सूरकडे दोन कुत्री आहेत. त्यांच्या भुंकण्याचा त्रास इमारतीमधील अन्य व्यावसायिकांना होत असतो.
यातून आठवड्यापूर्वी सर्व व्यावसायिकांनी मन्सूरचे दुकान बंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. त्याची माहिती समजताच व्यावसायिकांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी अमीर शेख यांनी शाहूपुरी पोलिसांत त्याच्या विरोधात तक्रार दिली.
दरम्यान, रात्री हॉटेलमधील व्यवस्थापक शकील मुजावर कॅश काऊंटरजवळ झोपले होते. मध्यरात्री दोनच्या दरम्यान, मन्सूरसह त्याचा भाऊ हमीद व अन्य दोन साथीदारांनी हॉटेलच्या दरवाजाची काच दगडाने फोडली. अचानक झालेल्या हल्ल्याने मुजावर भीतीने दुसऱ्या मजल्यावर पळून गेले. संशयितांनी हॉटेलमधील टीव्ही, संगणकासह खुर्च्या, टेबलची तोडफोड केली. संशयित निघून गेल्यानंतर मुजावर याने फोनवरून हॉटेल मालक अमीर शेख यांना माहिती दिली.
शेख यांनी हॉटेलमध्ये येऊन पाहणी केली असता साहित्याची तोडफोड झाली होती. पेट्रोलचे गोळे पडले होते. ते विझल्याने मोठा अनर्थ घडला नाही. काऊन्टरमधील ५० हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. हा संपूर्ण प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला आहे. याप्रकरणी शेख यांनी पुतण्यासह चौघांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करीत आहेत.