कोल्हापूर : सदर बाजार येथे कौटुंबिक वादातून महिलेने तीन वर्षांच्या मुलांसह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान ओळखून मायलेकास सुखरूप खाली आणले. सुमारे दोन तास सुरू असलेला थरार पाहताना नागरिक श्वास रोखून बसले होते.अधिक माहिती अशी, साहिली सचिन चिखलबी (वय ३२, रा. सदर बाजार, कोल्हापूर) ही पती, सासू-सासऱ्यासह राहते. तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. मोलमजुरीची कामे करून ते उदरनिर्वाह करीत असतात. रोज किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद होत असतो. रविवारी दुपारी पुन्हा वाद झाला. संतापलेल्या साहिली हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला कडेवर घेतले. त्यांच्या घराशेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाची चार मजली इमारत ओसाड पडली आहे.
या इमारतीच्या टेरेसवर ती गेली. तिच्या हातामध्ये फुटलेल्या बाटलीची काच होती. वरून तिने मी मुलासह उडी मारून आत्महत्या करणार आहे. माझ्या आत्महत्येला पती, सासू-सासरे जबाबदार आहेत, असे म्हणून ती ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून गल्लीतील लोक जमा झाले. त्यांनी खालून तिला आवाज देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने वरती कोणी येण्याचा प्रयत्न केला, तर मी उडी मारीन किंवा काचेच्या तुकड्याने स्वत:ला भोसकून घेईन, अशी धमकी दिली.
तिचा उद्रेक पाहून वरती जाण्याचे कोणी धाडस केले नाही. याच परिसरात राहणारे महादेव यादव यांनी थेट महापालिका कावळा नाका येथील अग्निशामक दलाचे कार्यालय गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती देताच जवान कांदा बांदेकर, मनीष रणभिसे, नवनाथ साबळे, रवी ढोंबरे, आकाश जाधव, प्रशांत तांदळे, सुनील यादव, सर्जेराव कांबळे, आदीजण अग्निशामक दलाच्या गाडीसह रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इमारतीच्या सभोवती जम्पिंग जाळी बांधली. जेणेकरून महिलेने खाली उडी मारल्यास ती जाळीत अडकावी. जवानांनी महिलेला बोलण्यात व्यस्त ठेवले. यावेळी पाठीमागून दोन युवकांनी वरती टेरेसवर जाऊन बेसावध असताना साहिली चिखलबी हिच्यासह मुलाला मागे ओढून घेतले. यावेळी तिने युवकांना सोडा मला, मरायचे आहे मला असे म्हणून त्यांच्या हातून सुटण्याचा प्रयत्न केला; मात्र युवकांनी चांगली पकड धरून ठेवली होती.
जवानांनी इमारतीवर धाव घेत मायलेकास सुखरूप खाली आणले. सुमारे दोन तास थरार सुरू होता. महिला टेरेसच्या अगदी कडेवर येऊन थांबल्याने खाली उभे असलेले नागरिक श्वास रोखून बसले होते. झटापटीमध्ये साहिली बेशुद्ध पडल्याने तिला मुलासह ‘सीपीआर’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.