कोल्हापूर : निवृत्त वडिलांच्या जागेवर पुणे रेल्वेत ‘अनुकंपा’खाली नोकरी मिळविण्यासाठी बोगस शैक्षणिक कागदपत्रे सादर करणाऱ्या सांगली येथील भामट्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.संशयित प्रकाश कल्लेशा इंडी (रा. वसंत मंदिर, गणेशमंदिराजवळ, सांगली) असे त्याचे नाव आहे. नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शिरोळ येथील फसवणुकीच्या गुन्ह्यात इंडी हा कारागृहात आहे.अधिक माहिती अशी, संशयित प्रकाश इंडीचे वडील कल्लेशा इंडी हे २०१३ मध्ये पुणे रेल्वेतून लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. ते सर्व प्रकारे शासनाकडून फायदा घेत असून, त्यांना पेन्शनही सुरू आहे. संशयित प्रकाश याने वडिलांच्या जागेवर ‘अनुकंपा’खाली नोकरी मिळावी, यासाठी पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला होता. त्यामध्ये लिपिक किंवा चतुर्थश्रेणी कामगार म्हणून नोकरी मिळावी, असे म्हटले आहे.
अर्जासोबत केंद्र शासनाच्या गृहमंत्रालय, महाराष्ट्र गृहमंत्रालय, सामान्य प्रशासन विभाग, अव्वल सचिव यांच्या नावाची बनावट सही शिक्यांची पत्रे जोडली होती. वर्षभर तो पाठपुरावा करीत होता. पुणे लोहमार्ग विभागात पाठविलेल्या अर्जाची एक प्रत त्याने कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याने राज्याच्या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला.
अनुकंपाखाली नोकरी मिळविण्यास तो अपात्र असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला शिफारस पत्र दिले कसे, याची चौकशी केली असता ते बोगस असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय गृहमंत्रालयानेही आम्ही कोणतेही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील लिपिक उमेश लंगोटे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.संशयित प्रकाश इंडीने यापूर्वी शासकीय कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी त्याच्यावर फसवणुकीचे १३ गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन असे तीन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो शिरोळ येथील एक ा फसवण्ुाकीच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. न्यायालयाच्या परवानगीने शाहूपुरी पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.