कोल्हापूर : येळवण जुगाई परिसरात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरू असून, त्याच माध्यमातून महिला बचत गटांना आपले रोजगार वाढविण्यासाठी पर्यटकांना जास्त आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि योजना राबवू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. त्यांच्या हस्ते येळवण जुगाई परिसरात विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेले शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई या गावी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुमारे सहा कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यातील येळवण जुगाईतील भंडारवाडी, गुरववाडी, चिखलवाडी, मालाईचा धनगरवाडा, पारिवणे तसेच पांढरेपाणी या सर्व वाड्यावस्त्यांवर अंतर्गत रस्ते व गटारी या मंजूर कामांचे उद्घाटन खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते येळवण जुगाई येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या हॉलचा वापर पंचक्रोशीतील कार्यक्रमांना, उत्सवांना आणि समारंभासाठी तर होणार आहेच; पण त्याच पद्धतीने तेथील विविध बचत गटांसाठी विक्रीचे स्टॉलही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पर्यटकांना येथे राहण्याची तसेच भोजनाची सोयही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याप्रसंगी योजनेच्या प्रभारी अधिकारी भाग्यश्री फरांदे, शाहूवाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी वाघमारे आणि वनाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.