कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जनावेळी विहिरीतील पाण्यात बुडताना युवकास वाचविल्याप्रकरणी अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी यांचा मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शहरातील बेलबागमधील गांजीवाली विहिरीमध्ये घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी तयार केलेली काहील घेऊन दीपक साळोखेंसह एकूण चौघेजण पाण्यात मध्यावर गेले. यावेळी अचानक काहील पाण्यात मध्यावर गेल्यानंतर उलटली.
यामध्ये असणारे चौघेजण पाण्यात पडले. त्यांतील तिघेजण पोहत बाहेर आले; तर तालमीचे कार्यकर्ते दीपक साळोखे हे पाण्यात बुडत असताना अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी यांनी क्षणाचाही विचार न करता धाडसाने पाण्यात उड्या मारून बुडणाऱ्या दीपक साळोखे या युवकाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविला.याबद्दल श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वतीने अमित आळवेकर आणि अभिजित सूर्यवंशी या दोघांचा सत्कार डॉ. सोनलकुमार कदम यांच्या हस्ते करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. यावेळी अनिल घाटगे, प्रा. अरुण पाटील, बुलबुले यांच्यासह तालीम मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार व उत्सव कमिटी उपाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, माजी नगरसेवक आनंदराव पायमल, प्रकाश टिपुगडे तसेच गणराया अवॉर्डचे परीक्षक, नागरिक उपस्थित होते.