कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) दर्गाह शरीफ यांचा उरुसाला संदल (गंध) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमाने सोमवारपासून सुरुवात झाली. विद्युत रोषणाईने सजविलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.रात्री सव्वा दहा वाजता पारंपरिक पद्धतीने बँडच्या गजरात संदल (गंध) लावण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी दर्ग्यातील मजारांना चंदन लावण्यात आले. मुख्य खादीम लियाकत मुजावर, एनुद्दीन मुल्ला, शकील मुतवल्ली, अल्ताफ मुतवल्ली, इम्तियाज मुतवल्ली, दिलावर मुजावर, शाहरूख गडवाले यांनी संदल लावला.
यावेळी संदल लावण्याबरोबरच फतिहा व दुवा करण्यासाठी हिंदू-मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज, मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता बाबूजमाल येथून गलेफ मिरवणूक निघणार आहे.
यावेळी येथील गावकामगार पाटील यांचे घराला भेट देऊन गुजरी, जुना राजवाडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फतिहा पठण होऊन मिरवणूक पुन्हा बाबूजमाल दर्गाह येथे परतणार आहे. मिरवणुकीनंतर बाबूजमाल दर्गाह शरीफ येथे गलेफ पाठविण्याचा कार्यक्रम होणार आहे.