कोल्हापूर : अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटी अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज सघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बाजीराव नानासो खाडे (रा. सांगरूळ) यांची निवड झाली. आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याचे प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे पत्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा, माजी खासदार मिनाक्षी नटराजन यांनी दिले.स्थानिक स्वराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विचाराबाबत जागरूकता निर्माण करणे व त्यांना कॉँग्रेस पक्षाशी जोडण्याचे महत्वपुर्ण काम पंचायत राज संघटना करते. राज्यातील तरूण कार्यकर्त्यांना या संघटनेची जबाबदारी दिली आहे.
बाजीराव खाडे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली. त्यानंतर २०१६ मध्ये कर्नाटक राज्याचा प्रभारी म्हणून काम केले. त्यांनी कॉँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत आक्रमकपणे पार पाडल्याने आता पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संधी दिली. त्याचबरोबर आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याचे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली.खाडे हे कृषी पदवीधर आहेत, नोकरी न करता आधूनिक शेतीकडे वळले. त्यातून स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्याशी जवळिकता आली. कॉँग्रेसच्या स्थापना दिनी २८ डिसेंबर १९९६ ला कॉँग्रेसचे प्राथमिक सभासद होऊन कामास सुरूवात केली. त्यानंतर आलेल्या १९९७ च्या जिल्हा परिषद निवडणूकीत खाडे यांनी सांगरूळ मतदारसंघातून उभे राहावे, अशी बोंद्रे यांची इच्छा होती. पण त्यावेळी बंधू बाळासाहेब खाडेंना संधी दिली.
प्रत्येक निवडणूकीत कॉँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केले पण व्यासपीठ मिळाले नाही. राहूल गांधी यांनी मतदान हक्क जागरूकता कार्यक्रम हातात घेतला आणि खाडे यांनी करवीर मतदारसंघात ११ दिवसाची ४०० किलो मीटर पदयात्रा काढून जागृती केली.