कोल्हापूर : दिवाळीनिमित्त सर्वत्र जल्लोष सुरू असताना बहुतांश शेतकरी वर्ग मात्र पिकांच्या मळणीत व्यस्थ असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. भात पिकांची कापणी, मळणी, पाखरणीची कामे सुरू असल्याने शेतकरी शिवारातच दृष्टीस पडत आहे. सणांचा झगमगाट घरात ठेवून शेतकरी वर्षभराची पोटाची बेगमी करण्यासाठी आपल्या कुटुंबासह शेतात राबत आहे. सणानिमित्त पै पाहुण्यांची वर्दळ सुरू असताना शेतकरी मात्र शिदोरी बांधून घेऊन सकाळी सकाळीच शेताची वाट तुडवत आहे.यंदा सुरुवातीला झालेल्या सलग पावसामुळे पेरण्याही उशिरा झाल्या. परिणामी पीक कापणी हंगामही लांबत गेला. कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन, भुईमुगासह भात पिकांच्या कापण्या गेल्या महिन्यात पूर्ण झाल्या; पण जास्त कालावधी घेणाºया भात आणि भुईमूग पिकांची आता काढणी सुरू झाली आहे. विशेषत: रोप लागण पद्धतीने पेरणी झालेली भात पिकांची काढणी सुरू आहे.पिकांची कापणी, मळणी करून त्याला वारे देण्यापासून ते वाळवून धान्य घरात आणण्याच्या कामात शेतकरी गुंग आहे. भाताचे काडसर अर्थात पिंजार हे जनावरांना वैरणीसाठी खाद्य म्हणून वापरले जाते. ते वर्षभर जनावरांना चारा म्हणून वापरले जात असल्याने, त्याची वाळवणी करून, ते रचून ठेवण्यासाठी शेतकरी कुटुंब राबताना दिसत आहे.ज्या ठिकाणी पिकांची काढणी पूर्ण झाली आहे, तेथे रब्बी हंगामासाठी शिवार तयार केले जात आहे; त्यासाठी नांगरटीपासून ते सरी, वाफे करण्यासाठी शेतकरी राबताना दिसत आहे. शाळूंची पेरणी करून त्याला पाणी देण्यात शेतकरी व्यस्त आहे. भारनियमनामुळे विजेचा खेळखंडोबा असतानाही वीजेच्या वेळापत्रकानुसार पाणी पाजण्याचे नियोजन सुरू आहे. उसाच्या पूर्व हंगामातील लागवडी जोरात सुरू आहेत, तर आडसाली लावणीसाठी बाळ भरणीच्या कामात शेतकरी मग्न आहे................................................