कोल्हापूर : महाराष्ट्र दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाण्यासाठी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी केले.राष्ट्रध्वजाचा मान राखणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दरवर्र्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम तसेच महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्र्थी तसेच नागरिकांकडून कागद व प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.
हे कार्यक्रम झाल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले असतात. ते पायदळी तुडविले त्याचा अवमान होतो. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलमामध्ये राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत तरतूद केलेली आहे.
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद केलेले नाही. त्यामुळे कोणीही अशा राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. तरीही राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा १९७१ कलम २ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.