कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) मूलभूत सुविधांप्रश्नी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.‘सीपीआर’ बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता कार्यालयात डॉ. नणंदकर यांची भेट घेतली. ‘सीपीआर’मध्ये औषधांचा तुटवडा, रेबिज प्रतिबंधक लस, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील विम्याच्या पैशातून येणाऱ्या पैशातून आपण काय खरेदी केली, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यावेळी डॉ. व्ही. ए. देशमुख उपस्थित होते.सध्या ‘सीपीआर’मध्ये औषधांचा तुटवडा होत आहे; त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणावे लागत आहे. तसेच रेबिज प्रतिबंधक लसचाही तुटवडा आहे. या तुटवड्यामुळे रुग्णांना ही लस विकत आणावी लागत आहे. याचबरोबर ‘सीपीआर’मध्ये अस्वच्छता आहे. केसपेपर नोंदणी खिडकी बंद आहे. ती तत्काळ सुरू करावी. व्हेंटिलेटर कमी आहेत, त्या वाढवावेत. लिफ्ट बंद आहेत; त्यामुळे रुग्णांसह नागरिकांची गैरसोय होत असल्याचे समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सांगितले. यावर लवकरच या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी आश्वासन दिले.यावेळी बबन रागने यांनी जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची याप्रश्नी संयुक्त बैठक घ्यावी, तरच हे प्रश्न सुटतील, असे सांगितले. शिष्टमंडळात संभाजीराव जगदाळे, प्रकाश पाटील, बाबूराव बोडके, अवधुत पाटील, महादेव पाटील, प्रताप नाईक, चंद्रकांत बराले, चंद्रकांत कांडेकरी, कादर मलबारी, आनंद म्हाळुंगेकर, भाऊसाहेब काळे, शरद साळोखे, शुभम शिरहट आदींचा सहभाग होता.