कोल्हापूर : एकीकाळे कामगार संघटना देशाचे राजकारण ठरवत होती, पण जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीला धक्का बसला आहे. कोणतेही सरकार आले तरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर यावेच लागते, भाजप सरकारच्या कालावधीत कामगार वर्गासह सर्वच क्षेत्रात अस्वस्थता पसरली असून याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार रहा. असे आवाहन ‘आयटक’च्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेस (आयटक)शी संलग्न जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा बुधवारी शाहू स्मारक भवनात झाला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. डॉ. पानसरे म्हणाल्या, स्वर्गीय गोविंद पानसरे यांनी उभी हयात कामगार चळवळीत घालविली. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानी शिकवणीच्या बळावर चळवळ पुढे चालू आहे. कोणतेही सरकार कष्टकऱ्यांना स्वइच्छेने देत नाही, त्यासाठी संघर्ष अटळ असतो. ‘आयटक’ ही जागतिक पातळीवरील मोठी संघटना असून त्यामाध्यमातून लाखो कष्टकऱ्यांना न्याय देता आला.
कष्ट, प्रामाणिकपणा व नैतिकता ही चळवळीची ताकद असून त्या भांडवलावरच सरकारला जाब विचारू शकतो. पण चळवळीचे विचार मान्य नसणाऱ्यांनी गोविंद पानसरे, दाभोलकर आदींची हत्या केली. साडे तीन वर्षे झाले तरी त्यांचा मास्टरमार्इंड सापडत नाही, हे दुर्देवी असून कर्नाटक पोलीसांनी गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या हत्येचा छडा लागला पण महाराष्ट्र पोलीस अजूनही चाचपडतच तपास करत आहे, यामागील गौडबंगाल काय? असा सवालही डॉ. पानसरे यांनी केला.‘आयटक’चे जनरल सेक्रेटरी दिलीप पवार म्हणाले, चळवळीच्या ताकदीवर असंघटीत कामगारांची महामंडळे झाली पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अनेकांच्या बलिदानातून कायदे निर्माण झाले, ते बदलण्याचे षडयंत्र सरकारचे सुरू असल्याने संघर्षासाठी तयार रहावे. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बळवंत पोवार, उमेश पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. जमीर शेख यांनी आभार मानले. विक्रम कदम, सशिला यादव, सदाशिव निकम आदी उपस्थित होते.