कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या वतीने गुरुवारी शहरातील विनापरवाना उभारण्यात आलेले २५ लहान बॅनर्स, १८ हातगाड्या, १६ केबिन व २५ शेड हटविण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फुल मार्केट परिसरात फुल विक्रेत्यांनी स्वत:च्या दुकान गाळ्यासमोर उभारलेल्या छपऱ्या तोडण्यात आल्या.गुरुवारी पर्ल हॉटेल, सासने ग्राऊंड, आदित्य कॉर्नर, आर. टी. ओ. आॅफिस या परिसरातील अनधिकृत व विनापरवाना होर्डिंग, बॅनर, केबिन, हातगाड्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फुल मार्केट परिसरात फुल विक्रेत्यांनी रस्त्याकडेला असलेले गटर बंद करून, त्यावर छपऱ्या उभा केल्या होत्या. अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यां नी तेथील गटार खुली केली, तसेच त्यावरील छपऱ्या काढल्या. याच ठिकाणी काही विक्रेत्यांनी विनापरवाना केबिन लावलेल्या होत्या. त्याही काढण्यात आल्या.सदरची कार्यवाही उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे, महादेव फुलारी, मीरा नगीमे, सर्व्हेअर श्याम शेटे, मुकादम व शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी केली.