कोल्हापूर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी साहाय्यक ठरणाऱ्या प्लाझ्मा दान प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांनी फारशी आस्था दाखवलेली नाही.
आतापर्यंत चार हजार ८०० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र यांपैकी केवळ ६० जणांना प्लाझ्माचे दान केले आहे. अडचणीत भरभरून मदत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरकरांनी या कामातही पुढाकार घेण्याची गरज आहे. तुमच्या पुढाकाराने कुणाचा तरी जीव वाचणार आहे, एवढे हे महान कार्य आहे.जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत या ६० जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. कोरोनातून पूर्ण बऱ्या झालेल्या नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक घटकांची चांगली वाढ झालेली असते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील प्लाझ्मा घटक घेऊन तो कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दिल्यास त्यांना कोरोनाविरोधातील लढाई सोपी होते.मात्र सातत्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाने आवाहन केल्यानंतरही प्लाझ्मा दान केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर २८ दिवसांमध्ये प्लाझ्मा द्यावा लागतो. मात्र पुन्हा सीपीआरकडे जायला नको, पुन्हा अशक्तपणा आला तर काय करायचे, पुन्हा ग्रामीण भागातून प्लाझ्मा द्यायला कुणी जायचे अशी अनेक कारणे सांगत नागरिक प्लाझ्मा दान करीत नसल्याचे दिसून आले आहे. केवळ प्लाझ्मा संकलन करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजनमधून तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही यंत्रणा सीपीआरच्या रक्तपेढीमध्ये बसवण्यात आली आहे.
आतापर्यंत सीपीआर रुग्णालयाच्या माध्यमातून २५ कोरोनाच्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा घटक पुरवण्यात आला आहे. यातील २० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू असून निगेटिव्ह नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यानिमित्ताने करीत आहे.- डॉ. वरुण बाफना, रक्तविकार विभागप्रमुख