कोल्हापूर : शेतातील सामायिक लिंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून भुयेवाडी (ता. करवीर) येथे भाऊबंदकीत काठी, कुऱ्हाड व काठी, लोखंडी पाईप यांनी झालेल्या मारामारीत आठजण जखमी झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २) रात्री घडली.या प्रकरणी संशयित विश्वास पांडुरंग पाटील, सागर आनंदा पाटील, अरुण विश्वास पाटील व मालूबाई विश्वास पाटील (चौघे रा. भुयेवाडी) यांच्याविरोधात उदय महादेव पाटील यांनी फिर्याद दिली; तर महादेव पांडुरंग पाटील, उदय महादेव पाटील, अंकुश महादेव पाटील व शालाबाई महादेव पाटील (चौघे रा. भुयेवाडी) या संशयितांविरोधात अरुण पाटील यांनी फिर्याद दिली.
या मारहाणीत महादेव पाटील, शालाबाई पाटील,उदय व अंकुश पाटील; तर अरुण, विश्वास, संगीता अरुण पाटील व सागर पाटील हे आठजण जखमी झाले. या सर्वांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांतील चौघांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, भुयेवाडीत शुक्रवारी दुपारी शेतातील लिंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून संशयित सागर पाटील, अरुण पाटील व मालुबाई पाटील यांनी उदय पाटील याच्या भावास घरात घुसून काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उदयचे वडील महादेव पाटील व आई शालाबाई यांना संशयित विश्वासने कुऱ्हाडीने डोक्यात वार करून जखमी केले. यात हे चौघे जखमी झाले.यानंतर महादेव पाटील, त्यांचा मुलगा उदय, अंकुश व शालाबाई पाटील यांनी सामायिक लिंबाच्या झाडाच्या हद्दमालकीच्या कारणावरून व झाड तोडण्याच्या कारणावरून अरुण पाटील व विश्वास, संगीता व सागर या चौघांना शिवीगाळ करून डोळ्यांत चटणी टाकली. त्यांना काठ्या व लोखंडी पाईपने मारहाण केली. यात हे चौघे जखमी झाले. या सर्वांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप तिबिले करीत आहेत.