हुपरी : प्रस्तावित असणारा कोल्हापूर ते विजापूर हा राज्य महामार्ग हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, रांगोळी परिसरातील गावांतून जाणार आहे. नियोजित रस्त्यासाठी या भागातील शेतकऱ्यांची जवळपास चारशे एकर बागायती शेती जाणार असल्यामुळे सर्वच शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी रस्त्याच्या या प्रस्तावित कामासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जाणार असल्याने अल्पभूधारक रस्त्यावर येणार आहेत. शासनाच्या या प्रस्तावित कामाला तीव्र स्वरूपाचा विरोध करण्यासाठी शेतकरी आता संघटित होत असून, तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत बैठका होत आहेत. पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी व परिसरातील गावांतून हा प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. या रस्त्याच्या कामात या भागातील बागायती शेती तसेच रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, अल्पभूधारक शेतकरी वर्गाचे अपरिमित नुकसान होणार आहे. प्रस्तावित रस्ता शेतीतून गेल्याने शेतीचे दोन भाग होऊन शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण होणार आहे.विकासासाठी रस्ते प्रकल्प महत्त्वाचे असले तरी नागरिकांच्या हितासाठीही शासनाने योग्य पद्धतीची उपाययोजना करणेही महत्त्वाचे आहे. हुपरी परिसरातून हा रस्ता जाणार असल्यामुळे चारशेहून अधिक एकर बागायती शेती, घरे, विहिरी, कूपनलिका त्यात जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित आराखड्यानुसार हुपरी, तळंदगे, इंगळी या गावच्या शेतीतून १०० फुटी रस्ते बांधण्यात येणार आहेत, तर तळंदगे रस्ता गिरी मळा ते औद्योगिक वसाहत भागात रस्ते, उपरस्ते यात धरले गेले आहेत. या आराखड्यामध्ये काही रस्ते अनावश्यक धरले गेले असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी या प्रस्तावास हरकत घेणार असल्याचे समजते. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, पैसाफंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे, कार्यकारी संचालक सदाशिवराव नाईक, अभय शास्त्री, संजय पाटील, जयसिंगराव देसाई, बाळासाहेब गाठ, बाहुबली गाठ यांच्यासह शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. यासाठी विविध भागात बैठका घेऊन प्रस्तावित रस्त्याची रूपरेषा व त्यामुळे होणारे नुकसान हे शेतकऱ्यांना पटवून सांगत आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकीत शासनाच्या या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला संघटित होऊन पूर्ण ताकदीने विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात येत आहे.
कोल्हापूर-विजापूर प्रस्तावित रस्त्यामुळे शेतकरी हवालदिल
By admin | Published: November 14, 2016 9:41 PM