कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीमधून बाराही तालुक्यांना बाईक अॅम्ब्युलन्स (दुचाकी रुग्णवाहिका) देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.
येथील अॅस्टर आधार आणि आयुर्झाेन इंडिया रेमिडीज प्रा. लि. यांच्यातर्फे बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, नॅशनल हेल्थ मिशनचे ईएमएसचे प्रकल्प संचालक दिलीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, वाढत्या कोल्हापूर शहरासाठी आणि उपनगरांसाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरणार असून, ग्रामीण भागातही ती अत्यावश्यक असल्याने बाराही तालुक्यांमध्ये ती सुरू करण्यात येईल.
आयुर्झाेनचे डॉ. प्रद्युम्न देशपांडे म्हणाले, या उपक्रमाविषयी पालकमंत्री पाटील यांच्याशी जेव्हा प्राथमिक चर्चा झाली, तेव्हापासून ही सेवा कधी सुरू करताय, असा आग्रह त्यांनी धरला होता. चिंचोळे रस्ते, अडचणीच्या ठिकाणी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
दिलीप जाधव म्हणाले, शक्यतो ही सेवा विनामोबदला ठेवण्यासाठी ‘अॅस्टर आधार’ने प्रयत्न करावेत. तसेच यासोबत असणाऱ्या डॉक्टरांनाही चांगले प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तसेच ही सेवा शासनाच्या सेवेशी संलग्न केल्यास तिचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ देता येईल.
विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, वास्तविक वाहतूक हे शास्त्र असले तरी कोल्हापुरात ती एक कला मानली जाते. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार कशीही, कुठूनही गाडी पुढे नेत असतात. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण या क्षेत्रांमध्ये रोज १0 जणांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे वाहतुकीचे नियमही पाळण्याची गरज आहे. अडचणीतील रुग्ण आणि अपघातग्रस्तांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल. याप्रसंगी या गाड्यांना नांगरे-पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी ‘अॅस्टर आधार’चे कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले, संचालक डॉ. अमोल कोडोलीकर, प्रशासकीय अधिकारी शिवानंद अपराज, विपणन महाप्रबंधक आर. आर. देशपांडे, अमोल कोरगावकर उपस्थित होते.७२७00१0१0१ या क्रमांकावर कॉल करा वरील क्रमांकावर कॉल केल्यास त्या ठिकाणी ही बाईक अॅम्ब्युलन्स पोहोचणार आहे. यासोबत डॉक्टर राहणार असून संबंधित रुग्णावर त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधिताला रुग्णालयात दाखल करण्यात येईल.कोल्हापुरातील ‘अॅस्टर आधार’च्या बाईक अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ. प्रद्युम्न देशपांडे, दिलीप जाधव, डॉ. उल्हास दामले, विश्वास नांगरे-पाटील, अमोल कोरगावकर उपस्थित होते.