कोल्हापूर : शाळकरी वयापासून कर्णाबद्दल आस्था असणाऱ्या शिवाजी सावंत यांनी ‘महाभारता’मध्ये उपेक्षित असलेल्या कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मृत्युंजय’ची निर्मिती केली, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिरच्या वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत सोमवारी ते बोलत होते.
‘मृत्युंजय’चा सुवर्णमहोत्सव’ या विषयावर मांडणी करताना डॉ. देशपांडे यांनी या कादंबरीची जन्मकथा सांगून त्यामध्ये असलेल्या कोल्हापूरकरांच्या अपूर्व अशा योगदानाचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. वाचन मंदिराचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे अध्यक्षस्थानी होते.डॉ. देशपांडे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेल्या शिवाजी सावंत यांनी येथील पापाच्या तिकटीवर हावळ टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यानंतर न्यायालयात नोकरी केली, परंतु कर्णावरील अभ्यासासाठी त्यांनी ती नोकरी सोडून राजाराम हायस्कूलमध्ये शॉर्टहॅण्डचे शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. जवळच असणाऱ्या करवीर नगर वाचन मंदिरामध्ये तासन्तास बसून त्यांनी ‘महाभारता’वरील अनेक ग्रंथ वाचून काढले.केदारनाथ मिश्र यांच्या कर्णावरील खंडकाव्याने प्रभावित होऊन सावंत यांनी एकीकडे सर्व प्रकारची टिपणे काढतानाच थेट कुरूक्षेत्राला भेट दिली आणि वयाच्या २३ व्या वर्षी ही कादंबरी लिहायला घेतली. २७ व्या वर्षी ती प्रकाशित झाली आणि आजही ५० वर्षे झाली तरी ही कादंबरी अजूनही सर्व वयोगटातील वाचकांना भावते हे या कादंबरीचे यश आहे, असे डॉ. देशपांडे म्हणाले.‘कनवा’चे संचालक डॉ. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर कोषाध्यक्ष डॉ. आशुतोेष देशपांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संचालक गुरूदत्त म्हाडगुत यांनी आभार मानले. गंथपाल मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महालक्ष्मी बँकेच्या उपाध्यक्षा मेघा जोशी, सुरेश सोनटक्के, रवींद्र जोशी, रजनी हिरळीकर, अशोक भोईटे, राजीव परुळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ग. दि. माडगूळकरांसह कुलकर्णींचे योगदानइतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘मृत्युंजय’ छापण्यासाठी कुणीही तयार नसताना सावंत यांचे मित्र आर. के. कुलकर्णी यांनी ते बाड ग. दि. माडगूळकर यांना वाचावयास दिले. माडगूळकर यांनी ते कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णींकडे सोपविले. ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यामुळे या कादंबरीच्या निर्मितीमध्ये या दोन कुलकर्णींचे मोठे योगदान आहे.