कोल्हापूर : शेजारील कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे. येथील प्रचारासाठी कोल्हापुरातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्याकडून गेल्या महिन्याभरापासून काम सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांवर प्रदेश स्तरावरून विधानसभानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या निर्देशानुसार महानगर जिल्हा भाजपकडे बेळगाव ग्रामीण जिल्हा विधानसभा निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची बेळगाव ग्रामीण जिल्हा निवडणूक मुख्य समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अंतर्गत आठ विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. या मतदारसंघांचे समन्वयक म्हणून महानगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.यामध्ये सौंदत्ती विधानसभेसाठी महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, कित्तूर विधानसभेसाठी सरचिटणीस अशोक देसाई, बेळगाव ग्रामीणसाठी विजयकांत आगरवाल, खानापूरसाठी संतोष लाड, रामदुर्गसाठी हेमंत आराध्ये, गोकाकसाठी संतोष भिवटे, आरभावीसाठी गणेश देसाई, बैलहोंगलसाठी सुभाष रामुगडे हे काम पाहणार आहेत.या समन्वयांकडून मतदारसंघात दौरे करून आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर बूथरचना व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रचाराची यंत्रणा गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे.