कोल्हापूर/निपाणी : कोल्हापूर-बंगलोर महामार्गावर निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर भरधाव मालवाहू बोलेरोचा टायर फुटून आयशर टॅम्पोला धडक बसून झालेल्या भिषण अपघातात दोन्ही वाहनातील पाचजण जागीच ठार झाले. मृतामध्ये कोल्हापूरातील तिघा भाजी विक्रेत्यांचा समावेश आहे.
नदीम इसाक बागवान (वय २४), शब्बीर करीम बागवान (२८), फयुम बागवान (२०), राज महमद अब्दूल गफार बागवान (३०, रा. भिमनगर, निपाणी, जि. बेळगाव), आयशर टॅम्पो चालक रमेश बी. बसाप्पा (४६, रा. हिरेकेरुर, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. आयशर टॅम्पोचा क्लिनर आनंद लम्माणी (२०, रा. हिरेकेरुर, जि. बेळगाव) हा जखमी आहे.
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. भरधाव वेगात ते कोल्हापूरच्या दिशेने येत असताना निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर येताच त्यांच्या गाडीचा डाव्या बाजूचा टायर फुटला. अचानक चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून बोलेरो महार्गावरील दूभाजकाला धडकून ती उडून पलिकडच्या रस्त्यावर साताऱ्याहून बंगलोरला वाहनांचे आॅईल घेवून जाणाऱ्या आयशर टॅम्पोला (के. ए. ५२, ५७१४) समोरुन जोराची धडक देवून रस्त्यावर कोसळली. त्यामध्ये बोलोरोतील चौघांसह टॅम्पोचा चालक जागीच ठार झाले.
बेळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक एच. टी. शेखर, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद पोवार, निपाणीचे निरीक्षक किशोर भरणी, शहर फौजदार अशोक चव्हाण यांनी अपघातस्थळी भेट दिली. अपघातानंतर महार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाग्रस्त वाहनातील अडकलेले मृतदेह बाहेर काढून ते रुग्णवाहीकेतून जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.
शब्बीर बागवान शब्बीर बागवान हा वडीलोपार्जित भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. निपाणीहून होलसेल दरात भाजीपाला खरेदी करुन तो उपनगरात फिरुन विक्री करीत होता. आई-वडीलांचे निधन झालेने त्याचेवर कुटूंबाची जबाबदारी होती. त्याच्या पश्चात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.