कोल्हापूर : शिवाजी पुल ते वडणगे गावच्या हद्दीतील झाड वाटेच्या शेतामध्ये मानवी कवटी करवीर पोलिसांना शुक्रवारी मिळून आली. ती पुरुषाची असल्याची शंका असून, याबाबत कावळा नाका येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवली आहे.अधिक माहिती अशी, फिर्यादी योगेश गोरक्षनाथ चंदनशिवे (वय ३०, रा. माळवाडी, वडणगे, ता. करवीर) यांनी आप्पासाहेब जोंदाळ यांची शिवाजी पुल येथील झाड वाटेच्या येथील शेत जमिनी करायला घेतली आहे.
नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेले असता, शेताच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये त्यांना मानवी कवटी दिसून आली. त्यांनी करवीर पोलिसांना फोनवरून तत्काळ कळविले. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आजूबाजूला आणखी काही अवशेष मिळतात का, त्याची पाहणी केली असता, काही मिळून आले नाही. मिळालेली कवटी ही पुरुषाची असण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरील पंचनामा करून, ती फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार आहे. येथून ही कवटी किती वर्षांच्या व्यक्तीची आहे. त्याचा मृत्यू कधी झाला आहे, याबाबतचे सर्व रिपोर्ट प्राप्त होतील.
काही दिवसांपूर्वी शेंडा पार्कातील रोपवनाच्या माळरानात पुरुषाची कवटी राजारामपुरी पोलिसांना मिळून आली होती. ही कवटी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली. अद्याप त्याचा कसलाही शोध लागलेला नाही.