कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा माझा प्लॅन वेगळा आहे. शहरालगतची काही गावे आज शहरात समाविष्ट झाल्यासारखी आहेत. या गावांना घेऊनच हद्दवाढ करण्याचा आपला प्रयत्न राहील. प्रस्तावात समाविष्ट असणारी काही गावे, दोन औद्योगिक वसाहती मागणार नाही. काही मोजकी गावे घेऊन हद्दवाढ करायची आहे. त्यामुळे ज्या गावाबाबत वादच नाही त्यांनी विनाकारण आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.महापालिकेतील आढावा बैठकीसाठी मुश्रीफ आले होते. त्यांना हद्दवाढीबद्दल विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली. मी आज या विषयावर बोलणार नव्हतो. हद्दवाढीचा माझा प्लॅन वेगळा आहे, काही मोजकी गावेच घेऊन हद्दवाढ करायची आहे. त्यामुळे अठरा गावे, दोन औद्योगिक वसाहतीमधील ग्रामस्त, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करणे उचित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.महापालिकेतील आढावा बैठकीत २१ विषयांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या विकासकामांचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन मुश्रीफ यांना दाखविण्यात आले. मुश्रीफ यांचे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले. रांगोळ्या, फुलांच्या माळांनी दरवाजे सजविण्यात आले होते. विविध संघटनांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आश्वासनांचा धडाका...
- शहरातील २२० एमएलडी सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण मार्च २०२४ पर्यंत शंभर टक्के रोखणार.
- शहरात कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, योग्य प्रक्रिया केली जाईल. टिपर घेण्यासाठी निधी देणार.
- ७९ कोटींच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित रक्कम मार्चपर्यंत देणार.
- सध्याच्या बहुमजली पार्किंग जागेत भक्तनिवास बांधणार, बदल प्रस्ताव देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना.
- शहराचे सुशोभीकरण, फुले रुग्णालयातील सुविधा सीएसआर फंडातून उपलब्ध करून देणार.
- महापालिकेच्या आरक्षित जागा मोकळ्या करून घेऊन तेथे ६९ आपले दवाखाने सुरू करणार.
- केएमटीकडे १०० ई बसेस घेण्यासाठी केंद्रीय शहरी वाहतूक मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार.
- केएमटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना.
- बाबुभाई परिख पुलाजवळ पादचारी उड्डाणपुलाला ३ कोटी ८८ लाखांचा निधी देणार.