कोल्हापूर : नऊ वर्षे आरोग्य सेवा आणि भरलेल्या रकमेचा दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील फिनॉमेल ग्रुप आॅफ कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने कोल्हापुरातील ६५० गुंतवणूकदारांना सुमारे २ कोटी ८० लाख रुपयांचा गंडा घातला.
या प्रकरणी आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे तक्रार दाखल झाली असून, सखोल चौकशी सुरू आहे. फसवणुकीमध्ये शासकीय अधिकारी, उद्योजक व शिक्षकांचा समावेश आहे.संशयित कंपनीचे अध्यक्ष नंदलाल केशन सिंग, उपाध्यक्ष टी. एम. एस. नायर, संचालक जोसेफ लाझर, विलास नारकर, संजय पाटील (सर्व रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या टोळीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. या कंपनीचे अनेक राज्यांत गुंतवणूकदार असून, आर्थिक घोटाळ्याची रक्कमही मोठी आहे.अधिक माहिती अशी, मरोळ नाका, अंधेरी (प.), मुंबई येथील फिनॉमेल ग्रुप आॅफ कंपनीच्या संचालक मंडळाने कोल्हापुरात प्रभाकर प्लाझा, तिसरा मजला, स्टेशन रोड येथे कार्यालय सुरू केले होते.
या ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करून लोकांना बोलावून घेतले जात होते. कंपनीचे अध्यक्ष नंदलाल सिंग, उपाध्यक्ष नायर, संचालक जोसेफ लाझर, विलास नारकर, संजय पाटील यांनी नऊ वर्षे आरोग्यविषयक सेवा आणि भरलेल्या रकमेच्या दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या या आमिषावर कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवत दहा हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत असे सुमारे १ कोटी २० लाख रुपये गुंतविले.
काही वर्षे ही सेवा उपलब्ध करून दिल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली. एप्रिल २००२ मध्ये नवीन कंपन्या काढून त्यांची नावे बदलली. त्यानंतर आरोग्य सेवा देणारी योजना बंद केली.
कंपनीच्या संचालक मंडळाने खोट्या योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून घेतले. त्या बदल्यात दिलेल्या मुदतीप्रमाणे सुविधा न देता, दुप्पट मिळणारा दोन कोटी ८० लाख रुपयांचा परतावाही दिला नाही.संशयितांनी फोनही बंद ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली. त्यांच्या तक्रार अर्जावरून मोहिते यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांना चौकशीचे आदेश दिले.