कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा खेळाडू व मूळ सांगलीचा असलेला आदित्य अतुल अनगळने १७ वर्षांखालील गटात सांघिक सेबर फेन्सिंग कॉमनवेल्थ (तलवारबाजी) स्पर्धेत कास्यपदक मिळविले. अनगळ हा पश्चिम महाराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे.इंग्लंडमधील न्यु कॅसल येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय सेबर संघाकडून त्याने प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच्या यशाबद्दल कोल्हापूर जिल्हा फेन्सिंग (तलवारबाजी) असोसिएशन गुरुवारी (दि. २) या ठिकाणी स्वागत करणार आहे.याबाबतची माहिती अशी की, सांगली-कुपवाड येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आदित्य अनगळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील आदर्श गुरुकुल विद्यालयाचा विद्यार्थी होता.
सातवीपासून त्याने फेन्सिंगला सुरुवात केली. वडिलांचे छत्र हरपलेल्या अशा संकट काळात व आई,भाऊ यांच्या साथीने त्याने हे यश मिळविले आहे. आदर्श गुरुकुल विद्यालयात त्याने याचे प्रशिक्षण घेतले. शालेय जीवनापासून तो तलवारबाजीचा या ठिकाणी सराव करत असत.
औरंगाबाद येथील भारतीय खेळ प्राधिकरणाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील आठ खेळाडू व दोन सैनिकी विद्यार्थ्यांची या स्पर्धेसाठी देशपातळीवर निवड झाली. यामधून तो सांघिक सेबर फेन्सिंग कॉमनवेल्थ (तलवारबाजी) स्पर्धेसाठी प्रतिनिधीत्व करत होता. या स्पर्धेत त्याने कास्यपदक मिळवले.सध्या तो हातकणंगले येथील आण्णासाहेब डांगे ज्युनिअर कॉलेज येथे ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याला संगीताची आवड असून तो चांगला तबलावादक आहे. त्याला व्हॉलीबॉलमध्ये आवड आहे.
भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र फेन्सिंगचे अध्यक्ष प्रकाश काटुळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, भारतीय खेळ प्राधिकरणाचे प्रशिक्षक तुकाराम म्हेत्रे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा फेन्सिंग (तलवारबाजी) असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विनय जाधव, प्रशिक्षक प्रफुल्ल धुमाळ, आदींचे त्याला सहकार्य लाभले.