कोल्हापूर : जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देणारा आणि शासनाच्या मदतीवर प्रमुख योजनांच्या मंजुरीकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारा सन २०१८-१९ सालचा अर्थसंकल्प शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या योजना नवीन अर्थसंकल्पात मागील पानावरूा पुढे जशाच्या तशा समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने जर मदत केली तरच या अर्थसंकल्पातील कामे पूर्ण होणार असल्याने त्याचे भवितव्य शासनाच्या इच्छेवरच अवलंबून आहे.कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भाजपचे आशिष ढवळे यांची निवड झाली असल्याने, तसेच राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने काही भरीव मदत पुढील वर्षासाठी होईल आणि त्याचा समावेश अर्थसंकल्पात असेल असे वाटले होते; परंतु सर्वांचीच निराशा झाली.
गतवर्षी कॉँग्रेसचे सभापती संदीप नेजदार यांनी मांडलेला, तसेच या वर्षी प्रशासनातर्फे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाचेच प्रतिबिंब आशिष ढवळे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उमटले आहेत. त्यात नावीन्यतेचा पूर्णत: अभाव आहे.अर्थसंपल्प सादर करताना योजना जरी जुन्या असल्या तरी यावर्षी त्याकरिता राज्य सरकारकडून निधी आणणार आणि त्या पूर्ण करणार, असा निर्धार ढवळे यांनी सभागृहात व्यक्त केला. आयुक्तांनी ११५९ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यामध्ये ३७ कोटी ३९ लाख रुपयांची वाढ सुचवून हा अर्थसंकल्प ११९६ कोटी ३९ लाखांच्या घरात नेऊन ठेवला आहे. ही वाढ घरफाळा, नगररचना, परवाना, इस्टेट विभाग यांच्याकडील अपेक्षित उत्पन्नातून सुचविलेली आहे.‘परिवर्तनाच्या समृद्धीतून श्रीमंतीकडे वाटचाल करणारे महानगर’अशा शब्दांत सभापती ढवळे यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन केले असले तरी कोणाची श्रीमंती होणार, शहराचा विकास कसा होणार, पर्यटन वृद्धीकरिता काय करणार, याचा कसलाही स्पष्ट उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.
३२.४३ कोटींचा निधी आणणारकेशवराव भोसले नाट्यगृह परिसर विकास नऊ कोटी ९३ लाख, सेफसिटी दुसरा टप्पा १२ कोटी, टर्नटेबल लॅटर वाहन ८.५० कोटी आणि केंद्र सरकारच्या ‘खेला इंडिया योजने’अंतर्गत बहुउद्देशीय क्रीडा सभागृह आठ कोटी अशा चार महत्त्वाच्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमच्या आघाडीची चर्चा झाली आहे. त्यामुळे या योजना यावर्षीच पूर्ण होतील, असा दावा ढवळे यांनी केला.
नवीन नाट्यगृहाचा १५ कोटींचा प्रस्तावकेशवराव भोसले नाट्यगृहाला पर्यायी नाट्यगृह म्हणून नवीन नाट्यगृहाचा एक प्रस्ताव तयार केला आहे. महासैनिक दरबार हॉलच्या समोरील शासकीय जागेत हे नाट्यगृह उभारण्याचा विचार असून, त्याकरिता १५ कोटींचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यालाही मंजुरी मिळेल, असा आशावाद ढवळे यांनी व्यक्त केला.
रस्त्यांकरीता ४.५० कोटीशहरातील अंतर्गत रस्ते तयार करण्याकरिता ४.५० कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. नगरसेवकांना प्रशासनाने दोन लाख रुपये ऐच्छिक बजेट देण्याचे मान्य केले होते. त्यामध्ये आणखी पाच लाखांची भर टाकून प्रत्येक नगरसेवकांना सात लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्याकरिता चार कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय प्रभागातील लोकोपयोगी काम ‘डी २०’ या हेडखाली मूलभूत सेवा पुरविण्याकरिता ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. शिक्षण समितीला पन्नास टक्के अनुदानाशिवाय सेवा सुविधा पुरविण्याकरिता ४० लाखांची स्वतंत्र तरतूद केली आहे.
पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र निधीअर्थसंकल्पात महापौरांना ३० लाख, उपमहापौरांना १५ लाख, स्थायी सभापतींना २५ लाख, विरोधी पक्षनेते यांना १५ लाख, तर गटनेत्यांना प्रत्येकी सहा लाखांचा निधी स्वतंत्रपणे देण्याची तरतूद केली आहे.
प्रशासकीय इमारत उभारणारमहानगरपालिकेच्या नव्याने प्रस्तावित केलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीकरिता ६५ कोटी इतका खर्च येणार असल्याने शासनाकडून निधी प्राप्त करून घेण्यात येणार आहे. त्याचसाठी अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजपचे सरकार असल्याने हा निधी आणला जाईल, असे सभापती ढवळे यांनी सांगितले.
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कदमवाडी, बोंदे्रनगर, सुभाषनगर, कामगार चाळ व शिवाजी पार्क या ठिकाणी झोपडपट्टीवासियांना घरकुल योजना राबविणार.
- - काळम्मावाडी योजना व भुयारी गटर योजना पूर्ण करण्याचा मानस.
- - घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत तीस टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्लॅँट एप्रिल २०१८ अखेर सुरू करणार.
- - ‘मनपा’ची ई-गव्हर्नन्स आॅफिस सक्षमीकरण, जीआयएस बेसड् प्रॉपर्टी सर्व्हे पूर्णत्वास नेणे, मोबाईल अॅपद्वारे मनपा प्रकल्पाची माहिती देणे, नागरिकांच्या सूचना, तसेच इतर सूचना आॅनलाईन करण्याची सोय करणे.
- - गाडी अड्डा येथे पाच मजली भक्त निवास उभारून तेथे ३५० चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करणार.
- - कोंबडी बाजार येथे पीपीपी तत्त्वावर बहुमजली व्यापारी संकुल बांधणार.
- - शहरातील १२ ते ३० मीटर रुंदीपर्यंतचे रस्ते ‘डी क्लास’ नियमावलीच्या तरतुदीनुसार विकसित करणे.
- - रंकाळा तलावाचे संवर्धन करण्याकरिता चार कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त.