‘कोल्हापूर चेंबर’ने सर्व संलग्न व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांच्या विविध संघटनांसाठी क्रिकेट स्पर्धा घेतली. त्याचे बक्षीस वितरण खासदार संभाजीराजे, ज्येष्ठ उद्योजक आणि झंवर ग्रुपचे संस्थापक रामप्रताप झंवर, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, ‘शाहूपुरी जिमखाना’चे अध्यक्ष विनोद कांबोज यांच्या हस्ते झाले. सराफ व्यापारी संघाचे कुणाल झाड यांना ‘सामनावीर चषक’ आणि ‘उत्कृष्ट फलंदाज चषक’, तर ‘मालिकावीर चषक’ व ‘उत्कृष्ट गोलंदाज चषक’ संजय माळी यांना प्रदान करण्यात आला. स्पर्धेला सहकार्य करणारे सिद्धार्थ लाटकर, रमेश लालवाणी, राज शेटे, संजय सारडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक राहूल नष्टे, प्रशांत पाटील, संपत पाटील, अनिल धडाम, इंद्रजित चव्हाण, अजित कोठारी, संभाजीराव पोवार, शिवानंद पिसे, विज्ञानंद मुंढे, विनोद पटेल, हितेंद्र पटेल उपस्थित होते. ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत केले. अंकुश निपाणीकर यांनी आभार मानले. दरम्यान, अंतिम सामन्यात ‘कॉम्प्युटर असोसिएशन’ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ‘सराफ व्यापारी’ संघाने प्रथम फलंदाजी करत १० षटकांत १२७ धावा केल्या. ‘कॉम्प्युटर असोसिएशन’चा खेळ १० षटकांत ७३ धावांवर आटोपला. त्यामुळे ‘सराफ व्यापारी’संघ विजयी झाला. या संघाच्या समर्थकांनी हलगी-खैताळ, ध्वनिक्षेपकावरील गीतांवर नृत्य करत जल्लोष केला.
चौकट
व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत करू
जीएसटीतील जाचक अटी दूर करून व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी संजय शेटे यांनी केली. त्यावर जीएसटीसह अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी दिली. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यांच्यातील खिलाडूवृत्ती दृढ करण्यासाठी ‘कोल्हापूर चेंबर’ने टाकलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.