कोल्हापूर : सतत गैरहजर राहणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन व बडतर्फ करण्याच्या कारवाईचा धडाका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सुरू ठेवला आहे. चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, त्यांना नोटीस देण्यात आली.यामध्ये आरोग्य विभागातील दीपक सुरेश कांबळे, झाडू कामगार दीपक कृष्णा जाधव व उद्यान विभागाचा शिपाई मनोज दिनकर तोरस्कर व अग्निशमन दलाचा सतीश रंगराव यादव अशी बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.
परंतु, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५६/२/ह नुसार या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. या कर्मचाऱ्यांना अपील करण्याची संधी आहे. याबाबतचे आदेश उपायुक्त मंगेश शिंदे यांनी काढले.
आयुक्तांच्या कारवाईचे स्वागतआयुक्त डॉ. चौधरी यांनी महापालिकेच्या प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वी त्यांनी सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. चार कर्मचाऱ्यांना सेवेतूून बडतर्फ केल्याने प्रशासनात खळबळ उडाली. चौधरी यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.