कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शहराबाहेरून ९२ किलोमीटरचा रिंगरोडचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी ४५२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाहतूक प्रश्नांबाबत सोमवारी घेतलेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतुकीच्या प्रश्नामध्ये मंत्री पाटील यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्यादृष्टीने दोन महिन्यांत सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमधील निर्णयांची पुढे प्रगती काय झाली याचा आढावा पाटील यांनी घेतला. यावेळी या प्रस्तावावर चर्चा झाली. पुणे, मुंबई, सोलापूरकडून गगनबावडा आणि आंबामार्गे कोकणाकडे ये-जा करणारी सर्व वाहने ही शहरातून जातात. त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण पडतो. पुढील काळाचा विचार करून हा रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे यांनी या बैठकीत ही माहिती दिली. कणेरी, कुडित्रे, वडणगे, रुकडी असा रस्ता९२ किलोमीटरपैकी २१ किलोमीटरसाठी केवळ भूसंपादन करावे लागेल. कारण अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची सुधारणा करून हा रिंगरोड अस्तित्वात आणला जाणार आहे. हा प्रकल्प मंजूर झाल्यास राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे सात मीटर रूंदीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल. कणेरीवाडीजवळच्या जाजल पेट्रोल पंपाजवळून हा रस्ता काढून कणेरी, गिरगांव, वाशी, कोगे, कुडित्रे, केर्ली, वडणगे, शिये, भुये, टोप, रुकडी पुन्हा जाजल पेट्रोल पंपाजवळ अशा पद्धतीने वर्तुळाकार रिंगरोड काढण्याचा हा प्रस्ताव आहे, तसे झाल्यास बाहेरून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांना कोल्हापुरात येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूरला मिळणार जादा पोलिस बळसोमवारी झालेल्या बैठकीचा वृत्तांत जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सादरीकरणासह मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितला. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते.
कोल्हापूर बाहेरून रिंग रोड --वाहतुकीची कोंडी टाळणे शक्य
By admin | Published: January 04, 2017 1:14 AM