कोल्हापूर : येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक कर्करोगदिनी म्हणजे ४ फेब्रुवारीला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मौखिक मोफत तपासणी करण्यात येणार आहे. डॉ. सूरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यानिमित्ताने विविध उपक्रम होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. रेश्मा पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पवार म्हणाल्या, प्रतिवर्षाप्रमाणे जिल्हा परिषदेत सकाळपासून ही तपासणी होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाईल. याचदिवशी दुपारी बारा वाजता कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील किर्लोस्कर ऑईल इंजिन्समध्ये कर्करोग जागृतीपर कामगार मेळावा घेण्यात येणार आहे.
दुपारी तीन वाजता आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी विशेष सवलतींच्या पॅकेजची घोषणा करण्यात येणार आहे. तसेच कोविड योध्द्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. यापुढच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांच्याही तपासणी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. योगेश अनाप, डॉ. शिरीष भामरे उपस्थित होते.
चौकट
परिस्थिती गंभीर
डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या, जीवनशैलीच्या बदलामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. यापुढच्या काळात २२ महिलांमागे दोघींना, तर ७२ पुरुषांमागे एका पुरुषाला कर्करोगाची शक्यता आहे. ४० वयाच्या आतील नागरिकांनाही ही लागण होत असल्याने देश उभारणाऱ्यांच्या वयोगटाला हा धोका जाणवत आहे. यासाठी जनजागरण, व्यसनमुक्ती आणि सातत्याने तपासणी आवश्यक आहे.