कोल्हापूर : कसबा बावड्यातील कचऱ्यांचा डोंगर आणि शिये येथील खणीचा प्रश्न यावर दिलीप पोवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कसबा बावड्यातील कचरा आता उचलणे शक्य नसून, त्या ठिकाणी ‘कॅपिंग’चा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तीन महिन्यांत कचऱ्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील कचरा उठाव, त्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या याबाबत मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांना धारेवर धरले. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांवर आयुक्त डॉ. चौधरी यांनी खुलासा केला.शहरातील कचरा उठावाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न अशोक जाधव यांनी विचारला. त्यावर आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, कसबा बावडा येथे सुमारे साडेचार लाख टन कचरा शिल्लक आहे.
तो दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; पण तो खर्च महापालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे तो कचऱ्याचा डोंगर त्याच ठिकाणी मुरवून तेथे बगीचा करण्याचा ‘कॅपिंग’चा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल.
त्यानंतर हा कचऱ्याचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कसबा बावड्यात कचऱ्याच्या नवीन प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्याचे अशोक जाधव यांनी सांगितले.
साडेआठ कोटींचा ‘टीडीआर’कचऱ्याच्या प्रश्नावर भूपाल शेटे यांनी, तावडे हॉटेल परिसरात कचऱ्याच्या आरक्षित जागेसाठी सुमारे साडेआठ कोटींचा ‘टीडीआर’ दिलेला आहे. मग ती आरक्षित जागा आपल्या हक्काची असताना त्या जागेत कचरा का टाकत नाही, असा प्रश्न आयुक्त डॉ. चौधरी यांना विचारला.