कोल्हापूर : खरेदी केलेल्या प्लॉटचा सात-बारा उतारा देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरच्या तलाठ्यावर शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. संशयित तलाठी संतोष रामचंद्र कुलकर्णी (वय ४१, रा. रचनाकार हौसिंग सोसायटी, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संशयित तलाठी कुलकर्णी याच्याविरोधात तक्रार आली होती. दोन शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दोन वेळा सापळा लावूनही तो सापडला नाही. अखेर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी फिर्याद दिल्याने ही कारवाई करण्यात आली.अधिक माहिती अशी, शिंगणापूर (ता. करवीर) येथील तक्रारदार अरुण बंडोपंत चोडणकर (वय ४१) यांनी १८ जानेवारी २०१३ रोजी २३०० स्क्वेअर मीटरचा प्लॉट आईच्या नावे खरेदी केला आहे. या प्लॉटच्या सात-बारा उताऱ्यावर आईचे नाव लावून घेणे गरजेचे होते. मात्र, कामाच्या व्यापातून पाच वर्षे नाव लावणे राहून गेले होते.
जानेवारी २०१८ मध्ये तक्रारदार शिंगणापूरचे तलाठी संतोष कुलकर्णी याच्याकडे गेले. सात-बारा उताऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी अर्ज दिला. परंतु, खरेदीनंतर बराच कालावधी झाला असल्याने नाव लावण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. त्यावर तक्रारदाराने २४ एप्रिलला मोबाईलवरून कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी लाचेच्या रकमेसंबंधी चर्चा करण्यासाठी त्यांनी तक्रारदारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बोलावले. ही रक्कम २५ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. त्याच दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तलाठी कुलकर्णी याच्याविरोधात तक्रार दिली. पथकाने तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला असता कुलकर्णी या ठिकाणी आलाच नाही.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या दीपक कांबळेच्या मोबाईलवरून कुलकर्णी याने तक्रारदारास फोन केला. आॅनलाइनचे काम सुरू असल्याने दहा-बारा दिवसांत तुमचे काम करतो, असा निरोप त्याने दिला. त्यानंतर स्वत: कुलकर्णी याने २५ मे रोजी तक्रारदारांच्या दुकानात जाऊन सात-बारा उतारा दिला.
यावेळी बदली झाल्याने पैसे नकोत, असेही सांगितले. कुलकर्णी याला आपल्याविरोधात लाचलुचपत विभागाने सापळा लावल्याची चाहूल लागली होती; त्यामुळे पैसे घेण्यास त्याने नकार दिला. लाचलुचपत विभागाने कुलकर्णी याने लाचेची मागणी केल्याचे पुरावे गोळा केले होते. त्यावरून त्याच्या विरोधात पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम सातप्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गोडे करीत आहेत.