कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरातील दुचाकी तोडफोड प्रकरणी मुख सूत्रधार संशयित जुनेद मुजावर (रा. सरनाईक वसाहत, कोल्हापूर) याला जुनाराजवाडा पोलीसांनी सोमवारी ताब्यात घेतले. त्याचे अन्य आठ साथीदार पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पूर्व वैमन्स्यातून मारहाण आणि तोडफोड केलेची कबुली मुजावर याने पोलीसांना दिली आहे.अधिक माहिती अशी, सचिन संभाजीराव पाडळकर (वय ३९, रा. पाडळकर गल्ली, हॉकी स्टेडियम परिसर) यांचा चौकात चायनिज गाडा आहे. सोमवारी (दि. ९) दूपारी सचिन पाडळकर यांना रितेश पाथरुट (सिरत मोहल्ला, जवाहरनगर) याने दारु पिवून मारहाण केली होती.
यावेळी साक्षीदार उदय पाडळकर, नितीन सातपूते यांनी समजावून पाथरुट याला माघारी पाठविले होते. त्यानंतर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास संशयित मुजावर, पाथरुटसह आठजण दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधून पाडळकर कॉलनीमध्ये आले.
येथील दारात लावलेल्या पाच दुचाकी हॉकी स्टीक, काठ्यांनी फोडल्या. तसेच परिसरात प्रचंड दहशत निर्माण करीत सचिन पाडळकर यांना बेदम मारहाण केली. पोलीसांनी मुजावर याला ताब्यात घेतले असून संशयित पाथरुटसह अन्य साथीदार पसार आहेत. त्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यांच्या मागावर पोलीस आहेत. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण करीत आहेत.