कोल्हापूर : रात्रीच्यावेळी शिवाजी पूल वाहनधारकांना सुरक्षीत वाटावा, योग दिशादर्शक म्हणून रहावा यासाठी शिवाजी पूलाचा रस्ता रात्रीच्यावेळीही आता वाहनाच्या प्रकाश झोतात परावर्तीत होऊन उजळून निघाला आहे. या पूलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे १३० ‘कॅट आईज’ हे रिप्लेक्टर बसविल्याने ते वाहनधारकांसाठी सुरक्षीत मार्ग दाखवत आहेत.ब्रिटीशकालीन शिवाजी पूलाचे आर्यूमान संपले, नवा पर्यायी पूल पूरातत्व खात्याच्या ‘लाल फितीत’ अडकला. त्यामुळे जुन्याच पुलावरुन वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोल्हापूर शहरानजीक कोकणला जोडणारा कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील हा प्रमुख पूल गणला जात असल्याने या मार्गाला महत्व आहे. पूलावर अपुरी लाईट व्यवस्था व पूलाची रूंदी कमी यामुळे या पूलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होती.दि. २६ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक मिनी बस या शिवाजी पूलावरुन कोसळून पंचगंगा नदीत १३ जणांना जलसमाधी मिळाली. दुर्घटना कशी घडली याबाबत सुमारे आठवडाभर पोलिस खाते, आरटीओ यांचे विचारमंथन सुरु होते.
वारंवार सीसी फुटेज तपासले. त्यावेळी चालकाने मद्यप्राशन केल्याचे तसेच चालकाला रस्त्याचा अंदाज न असल्याचे निष्कर्ष निघाले. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटनांना पायबंद बसावा यासाठी हा पूलाचा रस्ता अरुंद असला तरी वाहनधारकांसाठी सुरक्षीत वाटावा हीच भावना अनेकांनी व्यक्त केली.
त्यासाठी किमान पूलावरील रस्त्यावर दोन्हीही बाजूला ‘कॅट आईज’ हे रात्रीच्यावेळी प्रकाश किरण परावर्तीत करणारे किट (रिप्लेक्टर) बसविण्यात आलें आहे. सोमवारी दिवसभर हे काम पूर्ण करण्यात आले.संपूर्ण पूलावर रस्त्याच्या दोन्हीही बाजूला ६५-६५ अशी एकूण १३० कॅट आईज’ रिप्लेक्टर बसविण्यात आली आहेत. यामुळे या पूलावरील रस्त्याचे काठ हे छोट्या-छोट्या बल्बनी व्यापल्याचा भास वाहनधारकांना निर्माण होतो. त्यामुळे वाहनधारकांना हा रस्ता सुरक्षीत वाटत आहे.‘कॅट आईज’या रस्त्यावर बसविलेल्या रिप्लेक्टरला ‘कॅट आईज’ म्हणतात. रात्रीच्यावेळी मांजराच्या डोळ्यावर प्रकाश पडल्यास त्याचे डोळे चमकतात. त्याप्रमाणे हे रिप्लेक्टर रात्रीच्यावेळी चमकत असल्याने त्याला ‘कॅट आईज’ असे संबोधले जाते.