कोल्हापूर : शिवप्रताप दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हावा, अशी अपेक्षा शिव प्रतापदिन उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी सायंकाळी येथे व्यक्त केली.बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांना राज्यस्तरीय ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले’पुरस्कार मिळाला. त्याबद्दल हिंदुत्ववादी व सामाजिक संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी चौक येथे संभाजी साळुंखे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मुकुंद भावे, बजरंग दलाचे शहराध्यक्ष महेश उरसाल, प्रवीण मांडवकर, प्रमोद सावंत आदींची होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते संभाजी साळुंखे यांचा सपत्निक चांदीची तलवार व गोमाता मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.मिलिंद एकबोटे यांनी शिवप्रतापदीन हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहीजे. यासाठी प्रत्येक नागरीकाने आवाज उठवावा. तसेच यासाठी सरकार विरोधात आंदोलन करण्याचीही तयारी ठेवावी, असे आवाहन केले.
त्याचबरोबर संभाजी साळुंखे व महेश उरसाल यांच्या कार्याचा गौरव करत पाठीवर कौतुकाची थापही दिली. महेश उरसाल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.