कोल्हापूर : मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असून भाव मात्र तेजीत दिसत आहेत.
परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्याने खरीप पिकांचे नुकसान झालेच पण त्याबरोबर भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर दिसून येत असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज होणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात विविध भाज्यांची पाचशे क्विंटलने आवक मंदावली आहे.
आवक कमी झाल्याने दरात कमालीची वाढ झाली असून घाऊक बाजारात गतआठवड्यात १७ रुपये किलो असणारा कोबी आता तब्बल ४२ रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात वांगी ऐंशी रुपये किलो तर वरणा, गवार, कारली, भेंडी, दोडक्याचे दर चांगलेच भडकले आहेत. पालेभाज्यांची आवकही कमी झाली असून किरकोळ बाजारात मेथी वीस रुपये पेंढी तर पोकळा, पालक, शेपू दहा रुपये पेंढी दर राहिला आहे.
दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम थंड दिसत आहे. तूरडाळ, हरभराडाळ, मूग, मसूर डाळीचे दर स्थिर आहे. सरकी तेल, शेंगतेल, खोबरेल तेलाच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. पोहे, साखर, शेंगदाणाचे दर स्थिर आहेत. परतीच्या पावसाचा झटका कांदा उत्पादकांनाही बसला असून आवक कमी झाली आहे.
गत आठवड्यापेक्षा बाजारसमितीत दोन हजार क्विंटलने कांद्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम थेट दरावर झाला असून घाऊक बाजारात किलोमागे सरासरी १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याने चाळीशी ओलांडली आहे.
बटाटा, लसणाच्या आवक व दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये सफरचंद, मोसंबी, संत्री, डाळींब, चिक्कूची आवक चांगली आहे. सफरचंद ऐंशी रुपये किलो तर चिक्कू तीस रुपयांपासून दर आहे.
गुळाची आवक वाढलीपाऊस कमी झाला आणि दिवाळी संपल्याने गुऱ्हाळघरांची धुराडे आता पेटू लागली आहेत. त्यामुळे बाजार समितीत गुळाची आवक वाढली असली तरी दरात फारसा फरक दिसत नाही.