कोल्हापूर : निवळे (ता. कागल) येथील चांदोली अभयारण्यग्रस्तांना दिलेल्या जमिनी न्यायालयीन आदेशाने काढून घेण्यात आल्या आहेत. या जमिनी पुन्हा प्रकल्पग्रस्तांना मिळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.दुपारी एक वाजता टॉऊन हॉल उद्यान येथून ‘श्रमुद’चे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, संपत देसाई, मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. ‘आमच्या जमिनी परत द्या’ अशा घोषणा देत आंदोलकांचा मोर्चा सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोल पंपमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली.
यानंतर डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत चांदोली अभयारण्यातील निवळे गावातील ७२ प्रकल्पग्रस्तांचे गलगले (ता. कागल) येथे २००० साली पुनर्वसन झाले. तेव्हापासून ते जमीन कसत आहेत, परंतु ४ एप्रिल २०१८ ला अचानक न्यायालयाकडून जमीन सोडण्याच्या नोटिसा संबंधितांना आल्या आहेत.
यावर हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या एका बेंचने दिला असून, दुसऱ्या बेंचचा निर्णय हा प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आहे. त्यामुळे दोन्ही बेंच एकत्र येऊन यावर सकारात्मक निर्णय देतील, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ज्या जमिनींचा निकाल न्यायालयाकडून झालेला नाही अशा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी मूळ मालक काढून घेत आहेत, या मागणीवर अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी संबंधित मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे सांगितले.आंदोलनात शंकर पाटील, डी. के. बोडके, संतोष गोटल, आकाराम झोरे, वसंत पाटील, शफिक सय्यद, नजीर चौगले यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.