कोल्हापूर : मुश्रीफ यांचे वागणे दादागिरीचे व अजूनही आपण सत्तेत असल्यासारखे आहे, ते बरोबर नाही असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी दिला. आपल्या मतदारसंघासाठी निधी देताना सरकारकडून दूजाभाव केला जातो अशी तक्रार करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची नाटके त्यांनी बंद करावीत असेही मंत्री पाटील यांनी फटकारले.
महापालिका निवडणूकीत जातीचे दाखले मुदतीत दिले नाहीत म्हणून दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई झाल्यास कोल्हापूरात कायदा व सुव्यवस्था बिघडेल या राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या धमकीची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी अशा सूचनाही केली.
मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेवून महापालिका निवडणूकीत कांही अनुचित घडल्यास त्यास पालकमंत्री पाटील हेच जबाबदार असतील असे जाहीर केले होते. त्याची दखल घेवून मंत्री पाटील यांनी आपली बाजू स्पष्ट केली.हिवाळी अधिवेशनात मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निधी वाटपामध्ये दूजाभाव होतो म्हणून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाचे नाटक केले. त्यांच्या कागल मतदारसंघात मुश्रीफ यांचे सरकार असताना फक्त ६७ कोटी हजार ३५ लाख रुपये रस्त्यासाठी मिळाले होते.आम्ही १०२ कोटी ४८ लाख रुपये दिले आहेत.
चंदगड मतदारसंघांतही ५४ कोटी ५९ लाख त्यांच्याकाळात मिळाले होते. आमचे सरकार आल्यावर ४५० कोटी ८० लाखांचा निधी दिला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसच्या काळात १०९ कोटी मिळाले, आम्ही १०३६ कोटी २५ लाखांचा निधी दिला आहे. काँग्रेसच्यावेळी १० लाखासाठी पालकमंत्र्यांच्या मागे अनेक महिने पळावे लागत होते आणि तेच मुश्रीफ आता निधीत दूजाभाव होत असल्याची टीका करता हे हास्यास्पदच आहे.’