कोल्हापूर : मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जागा बदलावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सभासदांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना दिले आहे.
संघाचे मुख्य कार्यालय शाहूपुरी येथे आहे. या ठिकाणीच मजूर संस्थांचा सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जाते. संघाची साडेतीनशे सभासद संख्या आहे. या तुलनेत सभेची जागा फारच कमी आहे. येथे कसेबसे ४० ते ५० सभासदच बसू शकतात. त्यामुळे ही जागा बदलावीच; पण सभेच्या वेळेतही बदल करावा. चंदगड, आजरा येथून संघाचे सभासद सकाळी अकरा वाजता येऊ शकत नाहीत; त्यासाठी दुपारी एक वाजता सभेची वेळ ठरवावी, अशी मागणी मुकुंद पोवार व अॅड. शाहू काटकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली.त्याचबरोबर संघ व्यवस्थापनाकडून संघ वर्गणीच्या नावाखाली कोट्यवधींची वसुली लावली आहे. आमच्या संस्था जिल्हा परिषद, बांधकाम विभागाकडील कामे आम्ही आॅनलाईन पद्धतीने घेतो. येथे संघाचा काहीही संबंध नसतो. तरीही आमच्याकडून संघवर्गणी वसूल केली जाते. हे चुकीचे असल्याचे पोवार व अॅड. काटकर यांनी सांगितले. यावेळी सतीश साळोखे, संजय मोहिते, रमेश साळोखे, सदाशिव यादव, आदी उपस्थित होते.