कोल्हापूर : तासिका तत्त्वावरील (सी. एच. बी.) प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापूर विभाग शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाजवळ पकोडा आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोर्चा काढण्याचा इशारा सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने दिला. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. पी. माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक क्षेत्राचा मोलाचा वाटा असताना या क्षेत्रात अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांना शैक्षणिक वर्षाच्या शेवटी ५० हजार ४०० रुपये मानधन दिले जाते. ते देऊन एका उच्चशिक्षित, नवोदित प्राध्यापकांचा शासन अपमान करीत आहे. काही ठिकाणी किमान वेतन कायद्याच्या तरतुदींइतकेही वेतन दिले जात नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी सी. एच. बी. प्राध्यापक संघटनेने राजाराम कॉलेज परिसरातील शिक्षण सहसंचालक कार्यालयावर पकोडा आंदोलन केले.यावेळी राज्य संघटक गिरीश फोंडे म्हणाले, तुटपुंज्या पगारामुळे प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात. विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी हे कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. पी. माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आंदोलनात प्रा. सुनील भोसले, प्रा. बबन पाटोळे, प्रा. अमोल महापुरे, प्रा. अविनाश पाटील, प्रा. प्रकाश कांबळे, प्रा. सचिन देठे, प्रा. अशोक कोळेकर, प्रा. रोहित बारशिंगे, आदी प्राध्यापकांचा सहभाग होता.
या आहेत मागण्या...
- * तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दिले जाणारे तासिका मानधन २४० रुपयांऐवजी ६०० रुपये करावे.
- * तासिका मानधन हे सी. एच. बी.धारकांच्या बँक खात्यात जमा करावे.
- * मानधन प्रत्येक महिन्याला मिळावे. सध्या हे वर्षा-दोन वर्षांतून एकदम दिले जाते.
- * सी. एच. बी.धारकांना दिलेल्या तासिकांव्यतिरिक्त जादा काम केल्यास त्याचे मानधन मिळावे.
- * परीक्षा विभाग किंवा अन्य कोणत्या विभागामध्ये सदस्य म्हणून काम केल्यास त्याचे मानधन मिळावे.
- * रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी. सध्या राज्यात प्राध्यापकांच्या नऊ हजार जागा रिक्त आहेत.