कोल्हापूर : श्री अंबाबाई देवीच्या खजिन्याचे हवालदार म्हणून काम करत असलेल्या खांडेकर घराण्यातील महेश खांडेकर यांना नोकरीची आॅर्डर देण्यावरून सोमवारी देवस्थान समितीच्या बैठकीत समितीचे पदाधिकारी व सचिवांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शाहू महाराजांच्या सनदीवरून हा वाद चिघळल्याने दिवसभर वादावादी रंगली.शिवाजी पेठेतील मुख्य कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता देवस्थान समितीची मासिक बैठक होती. यात श्री अंबाबाई देवीच्या खजिन्याचे हवालदार म्हणून सेवा करत असलेले महेश खांडेकर यांना नोकरीची आॅर्डर देण्यात यावी व पगार वाढ करण्यात यावी हा विषय घेण्यात आला.
याबाबत देवस्थान समितीच्याच पदाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, त्याला अध्यक्ष महेश जाधव व सदस्यांनी मान्यता दिली. मात्र सचिवांनी कायद्याने सेवेकरींना अशी आॅर्डर देता येत नाही असे सांगत विरोध केला. यावर पदाधिकाऱ्यांनी सेवेकऱ्यांबाबत शाहू महाराजांची सनद आहे. त्यांना उत्पन्नाचे साधन व जमिनी दिल्या असून तसा त्यांचा शिक्का असल्याचे सांगितले.
मात्र आता संस्थान खालसा झाल्याने सनदेनुसार नव्हे तर कायद्यानुसारच निर्णय घ्यावा लागेल असे पवित्रा सचिवांनी घेतल्याने शाहू महाराजांच्या सनदेला महत्व आहे की नाही यावरून वादाला सुरवात झाली.सचिव नकारावर ठाम राहिल्यानंतर अध्यक्ष महेश जाधव यांनी खांडेकर यांच्या नियुक्तीबाबतची शाहू महाराजांची मुळ सनद काढा, कायद्याची कागदपत्रे द्या असे सांगून बैठकीच्या खोलीतून निघून गेले. सहसचिव एस.एस. साळवी यांनी पुढील विषयांवरून बैठक सुरु करू असे सांगितले मात्र पदाधिकाºयांनी त्याला नकार दिला व या विषयावरून बैठक थांबली.