कोल्हापूर : वर्षापूर्वी चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्यातील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीच्या अडीच टन रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी जप्त केली.महंमद समीउल्ला अब्दुलरशीद शेख (वय ४७) व मोहंमद रफिक मोहंमद समीउल्ला शेख (३६, दोघे रा. शिमोगा, कर्नाटक) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. या दोघांना मौजे कार्वे (ता. चंदगड) येथे पोलिसांनी पकडले.याबाबत पोलिसांनी सांगितले की, चिखली येथे वनविभागाची रोपवाटिका आहे. १८ जुलै २०१७ रोजी या रोपवाटिकावर आठ ते दहा अज्ञातांनी दरोडा टाकून चंदनाचे तेलाचे डबे, रक्तचंदनाची लाकडे व श्वेतचंदन लाकडाचे तुकडे असा सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांचा माल चोरून नेला होता.
याप्रकरणी संशयित संदीप बाळू वसव (२७, रा. गणेशनगर, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड , जि. सातारा), शिवा ऊर्फ शिनू चंदनवाले (३८, रा. रामोशी वाडा, गावठाण, रोफळे बुद्रुक, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मच्छिंद्र विलास बनसोडे (३०, गणेशनगर), संतोष सुग्रीव खुर्द (३५, रा. देगाव, ता. पंढरपूर) व इरफान अजिज बेग (४१, रा. शेषाद्रीपुरम, शंभर फुटी रोड, शिमोगा, जि. शिमोगापूर) अटक केली होती.
त्यावेळी त्यांच्याकडून १०० किलो चंदनतेल व ६४ किलोंचे श्वेतचंदनाचे लहान-मोठे तुकडे असा सुमारे ६१ लाख रुपयांचा माल जप्त केला होता. पोलीस या दरोड्यातील संशयितांचा शोध घेत होते.गुप्त बातमीदारानुसार या रोपवाटिकेतील रक्तचंदनाची लाकडे ही मौजे कार्वे (ता. चंदगड) येथे घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित महंमद शेख व मोहंमद शेख या दोघांना ४० लाखांच्या मुद्देमालासह पकडले. या दोघांनी ही चिखलीतील रक्तचंदनाची लाकडे असल्याची कबुली दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक युवराज आठरे, राजेंद्र सानप, सचिन पंडित यांच्यासह किरण गावडे, श्रीकांत पाटील, इकबाल महात, सुजय दावणे, आसिफ कलायगार, जितेंद्र भोसले, सुनील कवळेकर, आदींनी केली.