कोल्हापूर : इंटरनेटमुळे ज्ञान, माहितीचा खजिना सहजपणे उपलब्ध होत आहे; पण त्यासह आॅनलाईन धोक्यांची व्याप्ती वाढत आहे. त्याबाबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी नववर्षात कोल्हापूर जिल्ह्यात ‘चाईल्ड आॅनलाईन प्रोटेक्शन’ अभियान राबविण्यात येणार आहे.
सतेज पाटील फौंडेशनतर्फे आयोजित या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून दि. ८ जानेवारीला माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.आमदार पाटील म्हणाले, ‘चाईल्ड आॅनलाईन प्रोटेक्शन’ अभियान हे सतेज पाटील फौंडेशन, मुंबईतील अहान फौंडेशन, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि इतर शिक्षक संघटनांच्या वतीने वर्षभर राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षकांची दि. ८ जानेवारीला सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये कार्यशाळा होणार आहे.
त्यामध्ये मुंबईतील ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन्स’ या संस्थेतील तज्ज्ञ उन्मेष जोशी, आदी मार्गदर्शन करणार आहेत. हे अभियान शासनाच्या माध्यमातून राज्यभर राबविण्याची विनंती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना करणार आहे. या पत्रकार परिषदेस भगवान पाटील, भरत रसाळे, दादा लाड, जयंत आसगावकर, दत्ता पाटील, बाबा पाटील, राजेश वरक, शिवाजी कोरवी, ए. बी. पाटील, महादेव नरके, विलास पिंगळे, आदी उपस्थित होते.
अभियान राबविणारे असेप्रशिक्षित तंत्रस्नेही शिक्षक हे विद्यार्थी, पालकांचे प्रबोधन करतील. प्राथमिक शाळांमध्येही अभियान राबविण्यात येईल. ग्रामीण भागातील पालकांचे प्रबोधन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. भावी पिढीचे आॅनलाईन संकटांपासून संंरक्षण करण्यासाठी ‘डिजिटल गार्डियन’ची फळी उभारण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
जाणीव करून देणे आवश्यक‘अहान फौंडेशन’ हे गेल्या सहा वर्षांपासून ‘सायबर सुरक्षा’ विषयावर काम करीत आहे. या फौंडेशनने केलेल्या अभ्यासातून आणि सुमारे साडेआठ लाख प्रौढ आणि मुलांच्या अनुभवांवरून आॅनलाईनच्या आभासी जगातील सायबर धोक्यांना लहान मुले किती सहजपणे बळी पडतात, त्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्या धोक्यांमध्ये मानसिक छळवणूक, धोकादायक खेळ, लैंगिक मजकूर, छायाचित्रे, निद्रानाश, नैराश्य, आदींचा समावेश होतो.
बहुतांश प्रौढ व्यक्तींनाच आधुनिक तंत्रज्ञान, त्यावर आधारित साधने कशी वापरायची याचीच माहिती नसते. त्यामुळे ते संबंधित धोके, त्रासांबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे पालकांना आधी आॅनलाईन धोक्यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. ही जाणीव करून देण्यासाठी हे अभियान आम्ही हाती घेतले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.