कोल्हापूर : जगामध्ये झाला नाही, असा गरीब विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रपट महोत्सवाचा प्रयोग कोल्हापूरात केला आहे. या चित्रपट चळवळीतून मन आणि माणूस घडविण्याचा चिल्लर पार्टीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे कौतुकोद्गार कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी काढले.
येथील शाहू स्मारक भवन येथे चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत आयोजित दोन दिवसीय तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचा समारोप गुरुवारी झाला. यावेळी झालेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सुतार बोलत होेते. यावेळी चिल्लर पार्टीला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महोत्सवात महानगरपालिकेच्या ६0 शाळांमधील ३000 विद्यार्थी सहभागी झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विश्वास सुतार म्हणाले, चिल्लर पार्टीने आयोजित केलेल्या या चित्रपट महोत्सवात महानगरपालिकेच्या शाळेतील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून फक्त दहा विद्यार्थी जरी आयएएस झाले तरी मला या चळवळीचा हेतू साध्य होईल.
पतंग हे प्रतिक असलेल्या या महोत्सवातून जमिनीवर आपली मुळे घट्ट रोवून अवकाशात भरारी घ्या असा संदेश विद्यार्र्थ्यानी घ्यावा, तुम्ही फुलपाखरे आहात, फुलपाखरांप्रमाणे आनंदी, स्वच्छंदी रहा असे सांगून सुतार म्हणाले, चाकोरीबाहेर जाउन महानगरपालिका प्रशासन मुलांसाठी उपक्रम राबवत असते, त्यामुळे मुलांनी स्वत:चा सर्वांगिण विकास साधावा असे आवाहन केले.
प्रास्तविक चिल्लर पार्टीच्या अनुजा बकरे हिने केले. समीक्षा पाटील हिने स्वागत आणि परिचय करुन दिला, तर आभार चंद्रशेखर तुदिगाल याने मानले. यावेळी चिल्लर पार्टीचे हितचिंतक आॅलिम्पिक टारगेट शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक विनय पाटील, सागर खाडे, संदेश वास्कर, वैभव लडगे आणि हर्षद भेदा यांचा सुतार अभिजित कांबळे यांच्या हस्ते पुस्तक आणि मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन चिल्लर पार्टीचे समन्वयक मिलिंद यादव यांनी केले.
यावेळी विजय शिंदे, मिलिंद नाईक, साक्षी शिंदे, सुधाकर सावंत, सलीम महालकरी, उदय संकपाळ, यशोवर्धन आडनाईक, नसीम यादव, समीक्षा फराकटे, गुलाबराव देशमुख, विठ्ठल लगळी, सिध्दी नलावडे, श्रीराम जाधव, ए.के.शिंदे, अनिल काजवे, अभय बकरे, सचिन पाटील, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
चिल्लर पार्टी आयोजित या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बीएफजी, बोल्ट आणि द नट जॉब हे बालचित्रपट दाखविण्यात आले. या महोत्सवात महानगरपालिकेच्या ६0 शाळांमधील ३000 विद्यार्थ्यांनी हे चित्रपट पाहिले.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत गेली सहा वर्षे मुलांसाठी मोफत चित्रपट दाखविण्यात येतात. गेली तीन वर्षे गरीब आणि महानगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो. महानगरपालिकेच्या शाळांमधील निवडक ५00 विद्यार्थ्यांनी पतंगावर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन या महोत्सवात भरविण्यात आले आहे.